Monday, May 30, 2011

शुद्धलेखन ठेवा खिशात : अरुण फडके यांची पुस्तिका


       गणवेश की गणवेष?
       आधारित की आधारीत?
       बुद्धिवान की बुद्धीवान?
       विवाहित की विवाहीत?
       नीती की निती?
       टिप्पणी की टिपण्णी?

       अंधूक की अंधुक?

अशा शंकांवर मात करून ज्यांना नीटनेटकं मराठी लिहावंसं वाटतं, त्यांनी जरूर वाचावी व वापरावी अशी मार्गदर्शिका म्हणजे अरुण फडके संकल्पित व संपादित शुद्धलेखन ठेवा खिशात  ही पुस्तिका (पाचवी आवृत्ती, २०१०. किंमत रु. ३५/-). खरं तर हा एक लघुकोशच आहे ('लघू'; पण 'लघुकोश'). यात नेहमीच्या वापरातले सुमारे ११,००० शब्द आहेत, पण खरोखर खिशात बाळगता येईल इतकी ही पुस्तिका चिमुकली असून खिशात बाळगावीशी वाटेल इतकी तिची छ्पाई प्रसन्न आहे. "शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे" हे या पुस्तिकेचं ब्रीद आहे. 

प्रकाशनाचा पत्ता: 
अंकुर प्रकाशन, ६०२ - चित्रकूट सहनिवास, डॉ. आंबेडकर मार्ग, ठाणे (पश्चिम), ४०० ०६१
दूरध्वनी : २५४७ ४६२२

अरुण फडक्यांच्या शुद्धलेखनविषयक कामाबद्दलची ही एक लहान नोंद.


Saturday, May 28, 2011

Devki Pandit देवकी पंडित

  
'लोक' हा विषय मी फारसा हाताळलेला नाही.

देवकी पंडित, खुपते तिथे गुप्ते  या कार्यक्रमात अवधूत गुप्तेंशी मारलेल्या गप्पा (शनिवार, २८ मे २०११)




Monday, May 23, 2011

Kashmakash (कश्मकश): A Film by Rituparno Ghosh



कश्मकश  हा सिनेमा म्हणजे रितुपर्णो घोष यांच्या नौकाडुबी  या मूळ बंगाली चित्रपटाचं हिंदी 
रूपांतर आहे. रैमा सेन, रिया सेन, जिशू सेनगुप्ता, प्रसनजीत चॅटर्जी यांनी यात मुख्य कामं केली आहेत. 
हा सिनेमा रवींद्रनाथ ठाकूरांच्या (टागोरांच्या) नौकाडुबी  या नावाच्याच एका कादंबरीवर आधारित आहे, असं म्हटलं गेलं आहे. स्वत: दिग्दर्शकाने सिनेमाच्या सुरुवातीला तसा श्रेयोल्लेख केला आहे. परंतु हा सिनेमा बघून अनेक प्रश्न पडतात.
रवींद्रनाथांनी खरंच अशी रसिकवृंदाच्या चाकोरीबद्ध अपेक्षा पूर्ण करणारी, गोड शेवट असणारी, भावनाविव्हळ कादंबरी लिहिली होती का? की घोष-घई (निर्माता सुभाष घाई) जोडगोळीने (हिंदी 
रूपांतरापुरती) ती कादंबरी अशा स्वरुपात पडद्यावर साकार केली आहे? 
कश्मकश मधे सतत वाजणारं आक्रमक पार्श्वसंगीत मूळ बंगाली सिनेमातही आहे का? प्रत्येक गंभीर प्रसंगाचा हे संगीत कब्जा का घेतं? ही घोषांचीच करणी आहे की घईंची? 
प्रत्येक पात्र निर्वाणीच्या क्षणी खांबाला वा पलंगाला टेकून का उभं राहतं?
गतकाळ उभा करू पाहणार्‍या सिनेमातली प्रत्येक चौकट अतिनेत्रसुखद असायलाच हवी का?

हेमनलिनी (रैमा सेन) आणि नलिनाक्ष (प्रसनजित चॅटर्जी) वारंवार 'जख्म' आणि 'चोट' या दोन गोष्टींत फरक करतात. हे सुभाष घईंचं भाषांतर आहे की घोषांचा अन्वयार्थ की रवींद्रनाथांचं सर्जन? 
कश्मकश चं यश हेच की तो आपल्याला असे प्रश्न विचारायला भाग पाडतो. बाकी त्यात काही नाही.  

'इंडिया टुडे'मधील या सिनेमाचं कौतुकपर परीक्षण इथे आहे. चित्रपटाची गोष्ट सांगून टाकणारं व अनुकूल अभिप्राय देणारं अजून एक इंग्रजी परीक्षण इथे आहे.


रोबी ठाकूर

Thursday, May 19, 2011

व्हॅन गॉफचे बूट, वसंत आबाजी डहाके आणि मार्टिन हाइडेग्गर


व्हिन्सेंट व्हॅन गॉफचं एक चित्र आहे : बुटांची जोडी. 
 
चित्रात, नाव सांगतं त्याप्रमाणे, फक्त एक बुटांची जोडी आहे. आजूबाजूला मोकळा अवकाश आहे. एक बूट उलटा व दुसरा सुलटा आहे. 

हे कदाचित कुणा शेतकर्‍याचे बूट असावेत, नाहीतर खुद्द व्हॅन गॉफचे. पण हे नुसते बूट एका परिसराला जन्म देतात. वसंत आबाजी डहाक्यांच्या शब्दांत म्हणायचं तर "सान्निध्यावर आधारलेली ही लक्षणा आहे." (मालटेकडी, लोकवाड्मय गृह, मुंबई, २००९, पृष्ठ ९५)


Vincent van Gogh, A Pair of Shoes, 1886


बूट जो परिसर सुचवितात त्याची दोन रूपं आहेत - जग आणि पृथ्वी. त्या परिसराचं मूर्त, कळणारं रूप म्हणजे जग. आणि हे जग जिथून उगम पावतं, ज्या आधारावर उभं राहतं आणि ज्यामुळे या जगाला स्वतःच्या अन्य शक्यतांचं भान राहतं, तो जाणवणारा उगम व आधार म्हणजे पृथ्वी. अशा आशयाचं निरूपण मार्टिन हाइडेग्गरने (Martin Heidegger) आपल्या The Origin of the Work of Art  या निबंधात केलं आहे.  

मालटेकडीवरून   या  वसंत आबाजी डहाके यांच्या पुस्तकात या चित्राविषयी एक सुंदर लेख आहे. 
या लेखाचा शेवट असा आहे (पृ. ९६) :
 शेवटच्या दिवसांत त्यानं काढलेल्या चित्रात गव्हाच्या शेतातून कुठंतरी जाणारी आणि गडप होणारी वाट दाखवली आहे.
बूट म्हणजे चालणं. बूट म्हणजे रस्ते. बूट म्हणजे वाटा. बूट म्हणजे स्थलांतर. बूट म्हणजे निरंतर भ्रमण.
 गव्हाच्या शेतातल्या त्या वाटेनं व्हिन्सेंट गेलाच असेल, तर अनवाणी. त्याचे बूट त्यानं इथेच काढून ठेवलेले आहेत. 


   

Monday, May 16, 2011

वर्तमान


माझा महाराष्ट्र टाइम्स मधील विलास सारंग यांच्यावरील लेख - एक लेखकबिखक -  इथे  जाऊन वाचता येईल.

माझ्या एका भाषणावरील दैनिक प्रहार मधील टीकाटिप्पणी -  बिनमाणसाळलेलं भाषण  - इथे जाऊन वाचता येईल.  
हे 'बिनमाणसाळलेलं भाषण' कथास्वरूपात मुक्त शब्द  (शब्द पब्लिकेशन, मुंबई) मासिकाच्या मे २०११ च्या अंकात प्रकाशित झालं आहे.


रागिणी एम एम एस Ragini MMS


'सामान्य माणूस' या प्राण्याचा एक गुणविशेष रागिणी एम एम एस  पाहताना जाणवतो. नट (राज कुमार यादव) किंवा नटी (कैनाझ मोतीवाला) भीतीदायक प्रसंगात घाबरू लागले, थरथरू लागले, की सामान्य माणसं हसायला लागतात. कारण काय? कारण हेच की शांतपणे, गंभीरपणे, प्रेक्षकाच्या भूमिकेला साजेशा इमानदारीने पडद्यावरच्या घटना पाहिल्या की त्यांची भीतीने गाळण उडेल. ती सिनेमादत्त भीती आपल्यात भिनू नये याची ते हसून दक्षता घेतात. ज्यासाठी आपण आलो - सिनेमाचा अनुभव घेण्यासाठी -  ते काम सामान्य माणूस प्रामाणिकपणे, प्रांजळपणे करत नाही. 'घाबरलो' अशी कबुली देण्याची पाळी आपल्यावर येऊ नये म्हणून तो शौर्याचा आव आणून काल्पनिक पात्रांच्या अभिनीत, नाटकी भीतीला आधीच हसून घेतो आणि स्वत:चं बेरकीपण व दांभिकता प्रकट करतो. सिनेमाच्या विश्वात स्वत:ला झोकून न देण्याची जोखीम पत्करून सामान्य माणूस कलेच्या नादी लागू पाहतो. 

याचा अर्थ अर्थात असा नाही की रागिणी एम एम एस हा उत्कृष्ट भयपट आहे!



Psycho (1960), Alfred Hitchcock, Norman Bates' (his mother's) house


कबिराची एक कविता A Poem of Kabir


कबिराच्या एका कवितेचा अरविंद कृष्ण मेहरोत्रा यांनी केलेला इंग्रजी अनुवाद इथे आहे. 
तो असा : 

The Night Has Passed
KABIR
The night has passed
The day will too;
A heron nests
Where the black bee hummed.
Like a young bride thinking
Will he? Won't he?
The soul trembles with fear.

This raw clay pitcher
From which water leaks
And color runs
Is good for nothing
Once the swan has flown.

My time goes in shooing crows
The arms ache from it
And the palms burn.
That's the end of the story,
Kabir says.

काय विशेष आहे या कवितेत?
अर्थात अनुवादावरून कबिराची व त्याच्या मूळ कवितेची पारख करू नये. शिवाय कविता म्हणजे तिच्यातून व्यक्त होणारा विचार नव्हे.
पण मृत्यूचं सूचन याउपर काय आहे या कवितेत?

रात्र निघून गेली. तसाच दिवसही जाईल. जिथे भुंगा घुमत होता तिथे बगळा घरटं करतो. नववधू भीतीने थरकापते. तसा मीही कापतो.
मातीचं हे कच्चं मडकं. यातलं पाणी झिरपतं. रंगही गळतो. हंस एकदा उडून गेला की मडक्याचा तरी काय उपयोग?
कावळ्यांना हाकलत हाकलत माझा वेळ जातो. हात दुखतात. तळहात पोळतात. कबिराच्या कहाणीचा हा शेवट.

कवितेची झाकली मूठ. 

आधुनिकांची प्राचीनांबद्दल एक विचित्र समजूत असते. प्राचीनांनी त्या वेळी  असं म्हणून ठेवलंय, असा पवित्रा घेत आधुनिक प्राचीनांना दाद देतात. काळ जसजसा पुढे जातो तसतशी ज्ञानात वाढ होत जाते - आणि ती देखील सर्वांच्या! - अशी ही गाढ अडाणी समजूत आहे. काळ बाजूला ठेवून - मागचा किंवा आताचा काळ नव्हे, कोणताही काळ - कबिराची कविता वाचता येते का?  
 

आम्रपाली Amrapali

आम्रपाली  हा हिंदी सिनेमा १९६६ साली पडद्यावर झळकला. वैजयंतीमालाच्या देखण्या नृत्यामुळे आजही तो लोकांच्या स्मरणात आहे. (सुनील दत्तने आपल्या मूर्ख अभिनयाने तिला साथ दिली आहे!) 

आम्रपाली (
वैजयंतीमाला) ही प्राचीनकालीन वैशाली नगरीतली एक नगरवधू असते. 'नगरवधू' म्हणजे नृत्यगायनाने लोकांचं मनोरंजन करून अर्थप्राप्ती करणारी स्त्री, एक प्रकारची गणिका. 
पुढे ती राजदरबारात अद्वितीय नृत्य करून राजनर्तिकेचा किताब मिळवते. त्याच सुमारास शेजारच्या मगध नगरीचा राजा अजातशत्रू (सुनील दत्त) वैशालीवर अकस्मात आक्रमण करतो. वैशाली काबीज करण्याचं वडलांचं अपुरं स्वप्न पूर्ण करण्याचा त्याचा उथळ मनोदय असतो. परंतु युद्धात त्याचा पराभव होतो. तो स्वतः बाण लागून जखमी होतो. मग तो हुशारीने वैशालीच्या एका अर्धमृतावस्थेतील सैनिकाचा गणवेश घालून लपूनछपून वैशालीत शिरतो. योगायोगाने तो आम्रपालीच्या चंद्रमौळी घराच्या ओसरीत दाखल होतो. ती अनुकंपेने त्याची सेवा करते, त्याच्या छातीत रूतलेला बाण काढते. दोघं प्रेमात पडतात. (त्याच्या छातीतला खरा बाण प्रतीकात्मकही आहे.)    
          
वैशाली नगरीवर मनस्वी प्रेम करणारी, वैशाली नगरीलाच आपले मायबाप मानणारी आम्रपाली अजाणता शत्रूराज्याच्या आक्रमक, हिंसक सम्राटाच्या प्रेमात पडते. पुढे हे सारं उघडकीला येतं. दरबारात तिची क्रूर निंदा केली जाते.   



नकळत हातून झालेल्या या पापामुळे आम्रपाली हताश होते. तिच्यावर आमूलाग्र 
अनुरक्त झालेला अजातशत्रू तिला मगधला येण्याचं सुचवतो. तिचं मन अर्थात तयार होत नाही. मग अजातशत्रू वैशालीवर नव्याने हल्ला करतो. या हल्ल्यात वैशाली बेचिराग होते. 

तुझ्यासाठी मी वैशालीचा पाडाव केला, असं अजातशत्रू आम्रपालीला म्हणतो. रक्तलांछित, उजाड वैशाली पाहून आम्रपालीवर आभाळ कोसळतं. ती अर्जुनासारखी गर्भगळीत होते. तिला दुरून बुद्धमंत्र ऐकू येतो. राईत श्रमण शांतिमंत्र म्हणत असतात. ती तिथे जाते. बुद्धमूर्तीसमोर नत होते. जगाला वाचवण्यासाठीचा हा सन्मार्ग, अशी तिला जाणीव होते. अजातशत्रूही तिच्या मागोमाग तिथे येतो आणि नाटकी पद्धतीने हातातली तलवार मोडून टाकतो. आम्रपालीला पटकाविण्यासाठी तो ही कृती करतो की त्याचं खरोखर हृदयपरिवर्तन झालं आहे, असा प्रश्न पडतो.

अर्थात दिग्दर्शकाला
(लेख टंडन) असा प्रश्न मांडायचा नाही. त्याचा तसा हेतू नाही. आम्रपालीचं लावण्य, नृत्य, दरबाराचा सरंजाम इत्यादी नेत्रसुखद वस्तू दाखवून मनोरंजन करणं, हा त्याचा प्रथम व अंतिम उद्देश आहे. हे अर्थात हिंदी सिनेमाच्या परंपरेला धरून आहे. 

आम्रपाली ही खरीखुरी व्यक्ती होती, असं म्हणतात. बौद्ध वाड्मयात तिचे उल्लेख आहेत. ती अनाथ होती. ती अर्भकावस्थेत आंब्याच्या झाडाखाली सापडली. म्हणून तिचं नाव 'आम्रपाली' पडलं. 'आम्रपाली' म्हणजे आंब्याची पालवी. तिच्या मालकीची आमराई तिने बौद्धसंघाला दान केली होती, असंही म्हणतात. 'आमराईची पालक' असाही आम्रपाली या शब्दाचा एक अर्थ लावला जातो.

परंतु सिनेमात बौद्ध धम्म येतो तो अगदी शेवटी आणि तो देखील उपरा, आशावादी, शांतिवादी उपदेश म्हणून. वैशाली नगरीतलं प्रजातंत्र, मगधची राजेशाही, आम्रपालीचं वैशालीप्रेम, तिच्या बौद्ध धारणा व तिने नगरवधू म्हणून निभावलेली कारकीर्द यांच्यातले ताणेबाणे सिनेमा व्यक्त करत नाही. 

वैजयंतीमाला मात्र सुंदर. पडदाभर, सिनेमाभर तिचा नितांत व अतिशय वावर. 

(अर्थात या सिनेमात इतिहास किती, दंतकथा किती व 
'मेल गेझ' किती हा चर्चकांचा विषय आहे.) 

आम्रपाली  बघण्यासाठी इथे जा.  

Saturday, January 29, 2011

Krishnan Varma's short story 'The Grass-Eaters'



'The Grass-Eaters' by Krishnan Varma is a distinctive short-story. 

It's a simple humanistic tale of a poor couple who live in a pipe. I describe it as 'a simple humanistic tale' because the purpose seems to be provocation of our compassionate understanding. However, it is Varma's technique that intrigued me. The poor man narrates his and his wife's story in an icy way as though he is pleading coolly and rationally for the validity of their lifestyle. That's a chilling experience. This-is-not-a-pipe experience in a fundamentally different, scary sense.

I tried to know more about the author through Google, but couldn't find much. I found the story posted here. I read the story first in a high-school textbook, The International Story by Ruth Spack (Cambridge University Press, 1998).

Krishnan Varma, according to the author introduction in the textbook, "was born in Kerala, a southwestern state of India. He writes in English as well as in Malayalam. In many of his stories, Varma shares his observations of the life of the poorest people in his country."

The story is quite unlike most of the recent unimaginative 'Indian Writing in English' that pretends to be about the poor.