Friday, November 1, 2013

मी का लिहितो?
--------------------
प्रशान्त बागड 


(साहित्य अकादमीने ३० व ३१ मे २०१३ रोजी मुंबईत आयोजित केलेल्या ईशान्य आणि पश्चिम प्रांतांमधील युवा लेखकांच्या मेळाव्यात दिलेल्या मूळ इंग्रजी व्याख्यानाचे मराठीकरण. हे 'मुक्तशब्द' मासिकाच्या ऑक्टोबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालं आहे.)

साहित्य अकादमीच्या या व्यासपीठावर उभं राहून माझे लेखनविषयक विचार मांडताना मला खूप आनंद होत आहे. तरुण लेखकांच्या या मेळाव्यात सहभागी होण्याची व माझे विचार मांडण्याची ही संधी मला दिल्याबद्दल मी अकादमीचे मनापासून आभार मानतो.

'तरुण लेखक' असं म्हटल्या म्हटल्या मला फिलिप लार्किन यांची एक टिप्पणी आठवते. 'तरुण लेखक' हा वदतोव्याघात आहे असं लार्किन यांनी एके ठिकाणी म्हणून ठेवलं आहे. त्यांना नेमकं काय म्हणायचं असावं? तरुण माणूस लेखक असू किंवा होऊ शकत नाही? की जो लेखक असतो त्याला तरुण म्हणता येणार नाही? की लिखाणाला वय नसतं; लिखित संहिता वयातीत वा वयमुक्त असते? संहितेचं वयमुक्त अस्तित्व हा मुद्दा मला स्वत:ला पटतो किंवा भावतो. आपली संहिता काळाच्या दहशतीपासून मुक्त असावी अशी लेखकाची तळमळ असते. मी स्वतःला या अर्थाने लेखक मानतो: लेखक वाक्याची बंदिश घडवतो आणि अशा वाक्यबंदिशी घडवीत वयमुक्त संहिता निर्माण करण्याचा भगीरथ प्रयत्न करतो.

'मी का लिहितो?' हा तर चिरंतन प्रश्न आहे आणि सर्व चिरंतन प्रश्नांप्रमाणे तो आपल्याला निरूत्तरही करू शकतो. पण माझ्याकडे या प्रश्नाचं एक साधंसोपं आणि नीटनेटकं उत्तर आहे असं मला वाटतं. मी का बरं लिहितो? या क्षणात, अगदी आत्ताच्या या क्षणात या प्रश्नाचं उत्तर दडलं आहे. मी एका वाड्मयीन व्यासपीठावर उभा आहे, माझ्या हाती, फक्त माझ्या एकट्याच्या हाती, हा ध्वनिक्षेपक आहे, आणि आता 'मी का लिहितो?' या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे असं तुम्हाला वाटतंय. हाच तर तो एकमेवाद्वितीय क्षण आहे. माझं लिखाण घासूनपुसून लख्ख करताना मी याच सोनेरी क्षणाची वाट पाहत असतो. 'मी का लिहितो?' असं मला विचारलं जावं, खेळकर छद्मी प्रगल्भतेने विचारलं जावं, यासाठीच तर मी लिहीत असतो. हे एका सूत्रातही मांडता येईल: 'मी का लिहितो?' हा प्राचीन तात्त्विक प्रश्न आपल्याला विचारला जावा आणि त्याचं जाहीर उत्तर देण्याची संधी आपल्याला मिळावी म्हणून लेखक लिहीत असतो.

पण लेखक एवढ्या शांतपणे या क्षणाची, या उलटतपासणीची वाट पाहू शकतो ती कशाच्या जोरावर? या प्रश्नाचं उत्तर देताना आपण पुन्हा आपल्याच अंतर्मुखतेत गुंतून पडणार आहोत, आपण पुन्हा आपल्याच लिखाणाचे रहिवासी वा बंदी ठरणार आहोत हे लेखकाला कळून चुकलेलं असतं, म्हणून तो या प्रश्नाची वाट पाहतो. 'मी का लिहितो?' या प्रश्नाचं उत्तर देताना कराव्या लागणार्‍या आत्मपरीक्षणाची फलश्रुती हीच की आपण म्हणजे स्वत:च निर्माण केलेले कथात्म जीव आहोत, एक प्रकारचे ग्रेगर सॅम्सा आहोत, ही कबुली देणं. अशी कबुली देता यावी म्हणून लेखक लिहीत असतो.

लेखकाच्या उलटतपासणीचा काहीसा असाच प्रसंग प्लेटोच्या आयन  (Ion) नावाच्या संवादात आढळतो. आयन हा होमरच्या कवितांचं साभिनय निरूपण करणारा र्‍हॅप्सड (rhapsode) असतो. सॉक्रेटिस आणि आयनची भेट होते. खेळीमेळीत सॉक्रेटिस आयनला विचारतो, "तू होमरच्या कविता का गातोस? होमरच्या कविता सादर करणं म्हणजे त्यांच्या निर्मितीला, होमरच्या सर्जनाला हातभार लावण्यासारखंच आहे - ते तू का करतोस?" आयनचं उत्तर थोडंफार माझ्या उत्तरासारखंच आहे. मात्र आयनच्या उत्तराला प्लेटोने साशंकतेची जोड दिली आहे. आयन म्हणतो, "मला माझ्या होमर-आख्यानाव्यतिरिक्त दुसरं काही येत नाही. मी म्हणजे मी सादर करतो ती होमरची कविता." हे लेखकाचं भागधेय असतं का? आपल्या संहितांबाहेरचं त्याला काहीच 'येत नाही' का? कदाचित सॉक्रेटिसाच्या या संवादपर गोष्टीत प्लेटोची मेख असावी. कवितेचं अद्वितीयत्व वा पावित्र्य प्लेटोला सुचवायचं असावं: कवी - आणि कवितेचे श्रोते, जे कवीचा कवितारूपी आत्मगत उच्चार जणू चोरून ऐकतात - केवळ कवितेच्या नजरेनेच जग बघू शकतात.

'मी का लिहितो?' हा प्रश्न हाताळायला मिळण्याची लेखक वाट पाहतो ते असे 'प्लेटो-क्षण' वाट्याला यावेत म्हणून. अशा प्लेटो-क्षणी लेखक आपल्या अंतर्मुखतेच्या बहुस्तरीय, गोष्टीरूप प्रांगणात मुळं रोवून सांकेतिक व असांकेतिक, ज्ञात व अज्ञात, परिचित व पर नीट न्याहाळू शकतो. लेखक लिहीत असतो. (लिहिणं हे नेहमीच अकर्मक असतं हे आपण लक्षात घ्यायला हवं.) लिहिताना तो आयनसारख्या उलटतपासणीची वाट पाहत असतो आणि एका उल्हासपूर्ण उदासीत नवनवोन्मेषशाली प्लेटो-क्षण शोधत भटकत असतो. 

कदाचित म्हणूनच मी विवादे विषादे प्रमादे प्रवासे  हा माझा कथासंग्रह माझ्या मनातल्या प्लेटोला अर्पण केला असावा.

'मी का लिहितो?' या प्रश्नाचं अजून एक लहान उत्तर माझ्याकडे आहे असं मला वाटतं. लेखक, लिखाण, संहिता आणि लेखकाचं आपल्या संहितेविषयीचं मनोगत याविषयी माझा एक सिद्धांत वा सिद्धांतवजा गोष्ट आहे. ती सैद्धांतिक गोष्ट अशी: लेखकाने लिहिलेली संहिता, लेखकाने घडविलेली बंदिश ही एक प्रकारे पाळलेली शांतता असते, एक प्रकारचं मौनव्रत असतं. लिहिण्याचा निश्चय करून, न बोलण्याची शपथ घेऊन लेखक या व्रताशी बांधील असतो. त्यामुळेच 'मी का लिहितो?' या विषयावर बोलायला लेखकाला निमंत्रित केलं जातं तेव्हा तो न बोलता या प्रश्नाचं उत्तर देतो. मुळातच पूर्णत्व गाठलेल्या कथात्म विश्वाकडे अंगुलीनिर्देश करतोय अशा थाटात तो लिहिलेली एक संहिता वाचून दाखवतो.

माझी एकदा एका सुप्रसिद्ध बुकडिझाइनरशी गाठ पडली. आता हा बुकडिझाइनर खरा असेल वा खोटा असेल, वास्तविक असेल वा काल्पनिक असेल. मी लिहितो असं आमच्या दोघांच्या परिचिताने बुकडिझाइनरला सांगितलं. माझा कथासंग्रह प्रकाशित करताना मी त्यांचा सल्ला घ्यावा असंही परिचिताने सुचवलं. बुकडिझाइनर खूश झाले, 'जरूर' म्हणाले, त्यांच्या शब्दांत औदार्य होतं. मग त्यांनी विचारलं, "तुम्ही कशावर लिहिता?" क्षणार्धात माझ्यात पसरलेल्या अस्वस्थतेवर मात करणं अवघड होतं. "नाही, मी कथा लिहितो, फिक्शन लिहितो," मी म्हणालो. "तरी ... विषय कोणते?" त्यांचा उपप्रश्न. पण हा जवळजवळ आरोप होता. मला तिथून निघून जावंसं वाटलं. तरी मी म्हणत राहिलो, "मी कथा लिहितो, माझ्या कथांना विषय नसतात, मी 'काही-नाही'विषयी लिहितो." लगेचच मी त्या दॄश्यातून निर्गमन केलं आणि दोन निश्चय केले: पुस्तक सिद्ध करताना या बुकडिझाइनरला मुळीच भेटायचं नाही आणि 'मी का लिहितो?' या विषयावर बोलण्याची पहिली संधी मिळाली की हा प्रसंग सांगायचा. मी लिहितो - किंवा लेखक लिहितो - ते लिखाणाला विषय नसतो हे सिद्ध करण्यासाठी. लिखाण हे 'काही-नाही'विषयी असतं. लिखाण हे निष्कर्म असतं. जे या किंवा त्या बाबीविषयी नसतं ते लिखाण - साहित्याच्या या व्याखेचं प्रात्यक्षिक दाखवण्याच्या ईर्ष्येने लेखक लिहीत असतो.

लेखक नेहमीच एका मनोवेधक काळात राहत असतो. असंही म्हणता येईल की तो त्याच्या काळाचं एका मनोवेधक वस्तूत रूपांतर करत असतो. सध्या साहित्य 'डायस्पोरिक' होत चाललं आहे असं लेखकाचं म्हणणं आहे. डायस्पोरिक होणं म्हणजे केवळ आपल्या भूमीपासून दूर असणं नव्हे तर आपलं अस्तित्व त्या वस्तुस्थितीने बांधून घेणं; सार्त्रच्या भाषेत सांगायचं तर आपल्या 'फॅक्टिसिटी'त अस्तित्वाचं विसर्जन करून टाकणं. 'फॅक्टिसिटी'त स्वत:चं विसर्जन करून डायस्पोरिक साहित्य वाढीस लागतं. भौतिकदॄष्ट्या डायस्पोरिक असणारे इंग्रजीत लिहिणारे भारतीय हमखास काश्मीर आणि आग्रा आपल्या कथाकादंबर्‍यांत रेखाटतात किंवा अगदी अलीकडे आकाराला आलेल्या 'राष्ट्रा'बद्दल चर्चा करतात. मानसिकदॄष्ट्या डायस्पोरिक असणारे भारतीय मीरा किंवा बुद्धाबद्दल लिहितात. केवळ भारतीय इंग्रजी साहित्यातच डायस्पोरिक प्रवृत्ती आढळतात असं नाही. सद्यकालीन शेतकर्‍याच्या दुर्दशेचं चित्रण करू पाहणारा मराठी लेखकही उगीच भूतकाळाच्या हिरव्या कुरणात बागडताना दिसतो. स्वभूमीतच एक निराळी स्वभूमी - मग ती वास्तविक, काल्पनिक, रचित कशी का असेना - तो निर्माण करू इच्छितो. या डायस्पोरिक प्रवॄत्तीचा अंमल असलेलं साहित्य जगभर मूलभूत मानवी नीतिमूल्यांचा जयघोष करणारं वाड्मय म्हणून नावाजलं जातं. परिणामी हे डायस्पोरिक प्रवॄत्तीतून जन्माला येणारं साहित्य हे ठरावीक उद्दिष्टं गाठण्यासाठी केलेल्या तंत्रबद्ध कारागिरीसारखं वाटू लागतं. असं साहित्य साहित्यकलेच्या संकल्पनेवरच दरोडा घालण्याचा फार मोठा धोका आहे. लेखकाला या डायस्पोरिक प्रवॄत्तीपासून अंतर राखायचं आहे. डायस्पोरापेक्षा हस्तिदंती मनोरा बरा असं त्याचं म्हणणं आहे. कारण लेखकाला अधिक मनोवेधक काळ हवा आहे.

आपल्या काळाचं अधिक मनोवेधक वस्तूत रूपांतर करण्यासाठी लेखकाकडे जादूचं सामान असतं. त्याच्याकडे बॉलपेन, शाईचं पेन आणि जेल पेन असतं. टोक काढलेल्या आणि टोक न काढलेल्या पेन्सिली असतात. बर्‍याच पेन्सिली तर अजून न उघडलेल्या रंगीबेरंगी खोक्यातच पडून असतात. लेखकाकडे पांढर्‍या, हिरव्या, निळ्या वह्या असतात. ए-फोर आकाराचे बाँड पेपर्स असतात. लेखकाकडे एकदा एक टाइपराइटर होता. ऑलिम्पिआ कंपनीचा, जुन्या बाजारातून विकत घेतलेला, किंचित जड, त्याला एक पेटीसुद्धा होती, त्या पेटीत ठेवून तो इकडे तिकडे घेऊन जाता यायचा. प्रत्येक अक्षरागणिक परदेशी रात्रींच्या अवकाशात उमटणारा त्याचा आवाज स्वच्छ आणि नि:शंक असायचा. या जुन्या टाइपराइटरच्या त्या आवाजांचे प्रतिध्वनी अजून लेखकासोबत प्रवास करतात. घटनाप्रसंगांच्या चांदण्यांच्या मागोमाग रानोमाळ जायला सांगतात. कधीच न वापरलेला, कधीच स्पर्श न केलेला, कधीच स्वत:चा न झालेला एक इलेक्ट्रॉनिक टाइपराइटरही लेखकाकडे आहे. लेखक त्या अदृश्य इलेक्ट्रॉनिक टाइपराइटरखातर लिहीत असतो. लॅपटॉपच्या काळ्याशुभ्र कीबोर्डवर लेखकाची बोटं बॅले करतात. अक्षरांचे व चिन्हांचे आकार बोटं सहज वाचतात. कीबोर्ड, कोरं पान आणि अवतीभवती पसरलेली डेरेदार, निळीसावळी, गहन, पुष्कळ दुपार लेखकाला आवडते. पेनं, पेन्सिली, टाइपराइटर, लॅपटॉप आणि गहिरी दुपार यांच्याखातर लेखक लिहितो. लिखाणाविषयीचं लिखाण, 'मी का लिहितो?' या प्रश्नाचं उत्तर हेसुद्धा केवळ एक संहिता असते, शब्दावाक्यांचा थवा असतो, अंतर्मुखतेचा उदास कोश असतो, याची लेखकाला जाणीव असते, म्हणून तो लिहितो.   

© Prashant Bagad





No comments:

Post a Comment