Monday, May 16, 2011

आम्रपाली Amrapali

म्रपाली  हा हिंदी सिनेमा १९६६ साली पडद्यावर झळकला. वैजयंतीमालाच्या देखण्या नृत्यामुळे आजही तो लोकांच्या स्मरणात आहे. (सुनील दत्तने आपल्या मूर्ख अभिनयाने तिला साथ दिली आहे!) 

आम्रपाली (
वैजयंतीमाला) ही प्राचीनकालीन वैशाली नगरीतली एक नगरवधू असते. 'नगरवधू' म्हणजे नृत्यगायनाने लोकांचं मनोरंजन करून अर्थप्राप्ती करणारी स्त्री, एक प्रकारची गणिका. 
पुढे ती राजदरबारात अद्वितीय नृत्य करून राजनर्तिकेचा किताब मिळवते. त्याच सुमारास शेजारच्या मगध नगरीचा राजा अजातशत्रू (सुनील दत्तवैशालीवर अकस्मात आक्रमण करतो. वैशाली काबीज करण्याचं वडलांचं अपुरं स्वप्न पूर्ण करण्याचा त्याचा उथळ मनोदय असतो. परंतु युद्धात त्याचा पराभव होतो. तो स्वतः बाण लागून जखमी होतो. मग तो हुशारीने वैशालीच्या एका अर्धमृतावस्थेतील सैनिकाचा गणवेश घालून लपूनछपून वैशालीत शिरतो. योगायोगाने तो आम्रपालीच्या चंद्रमौळी घराच्या ओसरीत दाखल होतो. ती अनुकंपेने त्याची सेवा करते, त्याच्या छातीत रूतलेला बाण काढते. दोघं प्रेमात पडतात. (त्याच्या छातीतला खरा बाण प्रतीकात्मकही आहे.)    
          
वैशाली नगरीवर मनस्वी प्रेम करणारी, वैशाली नगरीलाच आपले मायबाप मानणारी आम्रपाली अजाणता शत्रूराज्याच्या आक्रमक, हिंसक सम्राटाच्या प्रेमात पडते. पुढे हे सारं उघडकीला येतं. दरबारात तिची क्रूर निंदा केली जाते.   



नकळत हातून झालेल्या या पापामुळे आम्रपाली हताश होते. तिच्यावर आमूलाग्र 
अनुरक्त झालेला अजातशत्रू तिला मगधला येण्याचं सुचवतो. तिचं मन अर्थात तयार होत नाही. मग अजातशत्रू वैशालीवर नव्याने हल्ला करतो. या हल्ल्यात वैशाली बेचिराग होते. 

तुझ्यासाठी मी वैशालीचा पाडाव केला, असं अजातशत्रू आम्रपालीला म्हणतो. रक्तलांछित, उजाड वैशाली पाहून आम्रपालीवर आभाळ कोसळतं. ती अर्जुनासारखी गर्भगळीत होते. तिला दुरून बुद्धमंत्र ऐकू येतो. राईत श्रमण शांतिमंत्र म्हणत असतात. ती तिथे जाते. बुद्धमूर्तीसमोर नत होते. जगाला वाचवण्यासाठीचा हा सन्मार्ग, अशी तिला जाणीव होते. अजातशत्रूही तिच्या मागोमाग तिथे येतो आणि नाटकी पद्धतीने हातातली तलवार मोडून टाकतो. आम्रपालीला पटकाविण्यासाठी तो ही कृती करतो की त्याचं खरोखर हृदयपरिवर्तन झालं आहे, असा प्रश्न पडतो.

अर्थात दिग्दर्शकाला
(लेख टंडन) असा प्रश्न मांडायचा नाही. त्याचा तसा हेतू नाही. आम्रपालीचं लावण्य, नृत्य, दरबाराचा सरंजाम इत्यादी नेत्रसुखद वस्तू दाखवून मनोरंजन करणं, हा त्याचा प्रथम व अंतिम उद्देश आहे. हे अर्थात हिंदी सिनेमाच्या परंपरेला धरून आहे. 

आम्रपाली ही खरीखुरी व्यक्ती होती, असं म्हणतात. बौद्ध वाड्मयात तिचे उल्लेख आहेत. ती अनाथ होती. ती अर्भकावस्थेत आंब्याच्या झाडाखाली सापडली. म्हणून तिचं नाव 'आम्रपाली' पडलं. 'आम्रपाली' म्हणजे आंब्याची पालवी. तिच्या मालकीची आमराई तिने बौद्धसंघाला दान केली होती, असंही म्हणतात. 'आमराईची पालक' असाही आम्रपाली या शब्दाचा एक अर्थ लावला जातो.

परंतु सिनेमात बौद्ध धम्म येतो तो अगदी शेवटी आणि तो देखील उपरा, आशावादी, शांतिवादी उपदेश म्हणून. वैशाली नगरीतलं प्रजातंत्र, मगधची राजेशाही, आम्रपालीचं वैशालीप्रेम, तिच्या बौद्ध धारणा व तिने नगरवधू म्हणून निभावलेली कारकीर्द यांच्यातले ताणेबाणे सिनेमा व्यक्त करत नाही. 

वैजयंतीमाला मात्र सुंदर. पडदाभर, सिनेमाभर तिचा नितांत व अतिशय वावर. 

(अर्थात या सिनेमात इतिहास किती, दंतकथा किती व 
'मेल गेझ' किती हा चर्चकांचा विषय आहे.) 

आम्रपाली  बघण्यासाठी इथे जा.  

No comments:

Post a Comment