Thursday, May 19, 2011

व्हॅन गॉफचे बूट, वसंत आबाजी डहाके आणि मार्टिन हाइडेग्गर


व्हिन्सेंट व्हॅन गॉफचं एक चित्र आहे : बुटांची जोडी. 
 
चित्रात, नाव सांगतं त्याप्रमाणे, फक्त एक बुटांची जोडी आहे. आजूबाजूला मोकळा अवकाश आहे. एक बूट उलटा व दुसरा सुलटा आहे. 

हे कदाचित कुणा शेतकर्‍याचे बूट असावेत, नाहीतर खुद्द व्हॅन गॉफचे. पण हे नुसते बूट एका परिसराला जन्म देतात. वसंत आबाजी डहाक्यांच्या शब्दांत म्हणायचं तर "सान्निध्यावर आधारलेली ही लक्षणा आहे." (मालटेकडी, लोकवाड्मय गृह, मुंबई, २००९, पृष्ठ ९५)


Vincent van Gogh, A Pair of Shoes, 1886


बूट जो परिसर सुचवितात त्याची दोन रूपं आहेत - जग आणि पृथ्वी. त्या परिसराचं मूर्त, कळणारं रूप म्हणजे जग. आणि हे जग जिथून उगम पावतं, ज्या आधारावर उभं राहतं आणि ज्यामुळे या जगाला स्वतःच्या अन्य शक्यतांचं भान राहतं, तो जाणवणारा उगम व आधार म्हणजे पृथ्वी. अशा आशयाचं निरूपण मार्टिन हाइडेग्गरने (Martin Heidegger) आपल्या The Origin of the Work of Art  या निबंधात केलं आहे.  

मालटेकडीवरून   या  वसंत आबाजी डहाके यांच्या पुस्तकात या चित्राविषयी एक सुंदर लेख आहे. 
या लेखाचा शेवट असा आहे (पृ. ९६) :
 शेवटच्या दिवसांत त्यानं काढलेल्या चित्रात गव्हाच्या शेतातून कुठंतरी जाणारी आणि गडप होणारी वाट दाखवली आहे.
बूट म्हणजे चालणं. बूट म्हणजे रस्ते. बूट म्हणजे वाटा. बूट म्हणजे स्थलांतर. बूट म्हणजे निरंतर भ्रमण.
 गव्हाच्या शेतातल्या त्या वाटेनं व्हिन्सेंट गेलाच असेल, तर अनवाणी. त्याचे बूट त्यानं इथेच काढून ठेवलेले आहेत. 


   

No comments:

Post a Comment